देवरुख : देवरुखजवळील सायले येथील चंद्रभागा स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देवरुख व पाटगाव केंद्रांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आणि पुस्तक प्रकाशन समारंभ मराठा भवन, देवरुख येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात सुमारे १२० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

देवरुख व पाटगाव केंद्राचे माजी केंद्रप्रमुख तथा चंद्रभागा स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अभिमन्यू रामचंद्र शिंदे यांनी आपल्या सेवाकाळात या केंद्रांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या यशाचे कौतुक व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे डॉ. अभिमन्यू शिंदे लिखित ‘अशी मने असे नमुने’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहनजी बने, देवरुखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, तालुक्यातील युवा नेतृत्व प्रद्युम्न माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. परीट साहेब ,प्रसिद्ध गझलकार देविदास पाटील आणि खेड येथील कवयित्री रूपाली पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश सावंत यांचा देखील सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा आणि त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस प्रेरणा देणारा हा सोहळा उपस्थितांसाठी आनंददायी ठरला.

विद्यार्थ्यांचा गुणवत्तागौरव आणि साहित्यनिर्मितीचा सन्मान अशा दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून साधण्यात आला. या सोहळ्याला देवरुख व परिसरातील शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर पवार व समीर मोहिते यांनी केले, तर संस्थेचे सचिव श्रीकांत शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.