छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी होत असल्याच्या तक्रारींनंतर पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक दुकानदारांनी साखरेची विक्री कमी केल्याच्या तक्रारी आहेत. शासनाचे निर्देश प्राप्त होताच पुरवठा विभाग अलर्ट झाला असून, आज मंगळवारी ‘वेल-मार्ट’मध्ये जाऊन साखरेच्या साठ्याची तपासणी करण्यात आली.
काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने १० विशेष पथके स्थापन केली आहेत. या मोहिमेत मॉल्स, मोठे स्वीटमार्ट, बेकरी आणि घाऊक विक्रेत्यांची तपासणी करण्यात येत आहे. घाऊक व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त १० मेट्रिक टन साखर साठवण्याची मर्यादा आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार, घाऊक व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त १० मेट्रिक टन साखर साठवण्याची मुभा आहे. यापेक्षा अधिक साठा आढळल्यास थेट जप्तीची कारवाई केली जाईल. तसेच संबंधितांविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती शहर पुरवठा अधिकारी भारती वाकोडे यांनी दिली.