चिपळूण: गेल्या ४० वर्षापेक्षा अधिक काळ कोकण खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या ‘चतुरंग प्रतिष्ठान’ संस्थेने कोकण शाळांतील स्वच्छतागृहांची बिकट अवस्था लक्षात घेऊन कोकण शाळा स्वच्छतागृह चतुरंग अभियान असा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या वहाळच्या शाळेत गेल्या ३० वषपिक्षा अधिक काळ ‘चतुरंग’चे निवासी आणि विचारतासी वर्ग योजिले जातात, जिथे सुमारे सव्वाशेच्या संख्येतील विद्यार्थी-शिक्षक कार्यकर्ते महिनाभर २४ तास निवासी वर्गासाठी ग्रास्तव्याला असतात,त्या न्यू इंग्लिश स्कूल वहाळ शाळेसाठीच, आपल्या अभियानांतर्गव पहिले प्रशस्त, दर्जेदार आणि नमुनेदार स्वच्छतागृह उभारणीचे काम ‘चतुरंग’ने प्राधान्याने हाती घेतले आणि पूर्णत्वास नेले आहे.

आज ‘चतुरंगने वहाळ शाळेकडे या स्वच्छतागृहाच्या हस्तांतरणाचा सोहळा अतिशय अभिनव पद्धतीने पार पाडला. या आगळ्या वेगळ्या सामाजिक-शैक्षणिक उपक्रमासाठी झाराप येथील ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर हे प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

त्यांनी आपल्या अत्यंत प्रभावी आणि ओघवत्या भाषाशैलीत, स्वच्छतागृहांचे त्यातही शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या प्रसाधनगृहांचे आरोग्यविषयक महत्त्व वैज्ञानिक आणि जीवन विषयक दृष्टिकोनातून समजावून दिले. चतुरंगने राबवलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे, कोकणातील अन्य गत प्रस्थापित व मातब्बर मंडळींनी आपापल्या गावातील शाळांसाठी कृतिशील अनुकरण करावे असे महत्त्वपूर्ण यथोचित आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, ‘चतुरंग’सारख्या एका सामाजिक संस्थेने एका शैक्षणिक संस्थेसाठी उभारलेले स्वच्छतागृह संकुल ही एक अनुकरणीय कृती असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.

विविध देणगीदारांच्या अर्थसहाय्यातून व विविध कंपन्यांच्या CSR फंडाच्या माध्यमातून चतुरंग संपर्कातील किमान १५-२० शाळांना त्यांच्या त्यांच्या विद्यार्थी पटसंख्येनुसार लहान-मोठी स्वच्छतागृहे, पुढच्या तीन-चार वर्षात बांधून देण्याचा चतुरंगचा मानस असल्याचे प्रतिपादन चतुरंगचे संस्थापक कार्यकर्ते विद्याधर निमकर यांनी आपल्या प्रास्तविकात केले.

वहाळ शाळेतील या स्वच्छतागृहासाठी शशिकला युवोत्कर्ष न्यास (पुणे), श्री. अभिषेक प्रकाश कुलकर्णी व सी. श्वेता देशपांडे (पुणे) यांचे भरघोस अर्थसहाय्य लाभल्याचा कृतज्ञपूर्ण उल्लेखही त्यांनी केला.

डॉ. प्रसाद देवघर आणि डॉ. विनय नातू यांच्या हस्ते या सुंदर स्वच्छतागृहाची प्रतिकात्मक प्रतिमा, श्री. नंदकुमार काटदरे सर आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. मिसाळ सर यांच्याकडे सुपूर्द करून एका वैशिष्ट्यपूर्ण रीतीने प्रस्तुत हस्तांतरण सोहळा पार पडला. एक प्रकारे देखण्या म्हणता येईल अशा या स्वच्छतागृहाची बांधकाम उभारणी प्रख्यात बांधकाम व्यवसायिक श्री. समीर ताम्हणे यांनी करून दिली.

या कार्यक्रमाला चिपळूण, वहाळ, सावर्डे येथील अनेक मान्यवर मंडळी तसेच विविध शाळांतील मुख्याध्यापक मंडळी आवर्जून उपस्थित होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतुरंग कार्यकर्त्या सौ. इंद्रायणी दीक्षित यांनी केले, तर कार्यक्रमास आणि उपक्रमास सहाय्यभूत झालेल्या सर्वांप्रती श्री. वामन कुलकर्णी सर यांनी चतुरंग परिवाराची मनोमन कृतज्ञता व्यक्त केली.