लोटे :- घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट , लवेल येथे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा देणारा ‘टेक इन्सिग्निया’ उपक्रम २४ ऑगस्ट २०२६ रोजी कॉम्प्युटर विभागाच्या एएससीईई समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले.या उपक्रमाद्वारे डेव्हलपर क्लब आणि रोबोटिक्स क्लबचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवनवीन कल्पना मांडण्यासाठी, सहकार्याने प्रकल्प विकसित करण्यासाठी तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.यानंतर दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत खजिना शोध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण २१ विद्यार्थी पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संस्थेच्या परिसरातील विविध ठिकाणी दहा संकेतचिन्हे लपविण्यात आली होती.

प्रत्येक संकेतचिन्हाच्या आधारे पुढील संकेत शोधत अंतिम संकेतचिन्हापर्यंत पोहोचणे, हे स्पर्धकांसमोरील आव्हान होते.स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी संघभावना, निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती, नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि समस्या सोडविण्याची क्षमता यांचा प्रभावी वापर केला. अंतिम दहावे संकेतचिन्ह शोधताना अत्यंत रोमांचक प्रसंग घडला. कॉम्प्युटर अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षातील एका पथकाने आणि एआयएमएलच्या तृतीय वर्षातील एका पथकाने एकाच वेळी अंतिम संकेतचिन्ह शोधले. त्यामुळे दोन्ही पथकांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.
या उपक्रमासाठी कॉम्प्युटर विभागाच्या विभागप्रमुख डॉ. ज्योती खालकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. एएससीईई समितीच्या प्राध्यापिका सौ. श्रद्धा गोपाळ यांनी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले. संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी उपक्रमास परवानगी देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘टेक इन्सिग्निया’ हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये टेक्निकल आवड, सर्जनशील विचार, संघभावना आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होण्यास मदत झाली.