रायगड : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमानी, प्रवासी आणि गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी पालकमंत्री भरत गोगावले यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी महामार्ग विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री भरत गोगावले यांनी खारपाडा, वडखळ, नागोठणे, कोलाड आणि माणगाव बायपास या महत्त्वाच्या मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करत महामार्गाची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडीची संभाव्य ठिकाणे, सुरक्षितता तसेच गणेशोत्सवाच्या काळातील वाढणारी वाहनांची संख्या याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार असल्याने मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत ठेवणे, आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियोजन करणे, अशा महत्त्वपूर्ण सूचना पालकमंत्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये आणि कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि खड्डेमुक्त व्हावा, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग कितपत सुस्थितीत आणला जातो, याकडे आता कोकणवासीयांसह चाकरमान्यांचे लक्ष लागले आहे.