मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड येथे आज राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पर्यवेक्षक शांताराम बैकर यांच्या उपस्थितीत भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशालेच्या इयत्ता नववी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनी व वर्गशिक्षकांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थिनी विधी आंबेकर हिने केले. यावेळी पाच विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा कारकिर्दीविषयी माहिती दिली.विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय अवेरे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा केला जात असल्याचे सांगितले. उत्कृष्ट ड्रिब्लिंग व गोल करण्याच्या कौशल्यामुळे मेजर ध्यानचंद यांना ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक शांताराम बैकर यांनी क्रीडा व आरोग्याचे महत्त्व जनमानसात रुजवणे हा राष्ट्रीय क्रीडा दिनाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. सराव, शिस्त व नेतृत्वगुणांच्या माध्यमातून देशाचे नाव जगाच्या पटलावर उंचावणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक गौतम माने यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी इयत्ता नववीची विद्यार्थिनी हिरण्या काटकर हिने उपस्थितांचे आभार मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात….
