मुंबई- नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात आलेल्या महापुराने हाहाकार उडाला असून यात जवळपास 579 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. भारतीय पर्यटकांची सुद्धा नेपाळमध्ये मोठी रेलचेल असते. महाराष्ट्रातील अनेक पर्यटक नेपाळला फिरण्यासाठी गेले होते. मात्र नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागातील महापुरात महाराष्ट्रातील 200 ते 404 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तर यातील सुमारे 100 ते 125 नागरिकांचा गट सुरक्षित आहे. सध्या सुरक्षित असलेले नागरिक हे मानसरोवराच्या दिशेने मार्गक्रमण करत असून परतीच्या प्रवासाला आहेत. महापुरामुळे नेपाळच्या सीमेवरील रस्ते इमिग्रेशन पोस्ट इत्यादी वाहून गेल्याने नेपाळ आणि चीन सरकारकडून परतीचा पर्यायी मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील सुमारे 60 जणांचा गट बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर आतापर्यंत 105 जण हे मायदेशात परतले आहेत. त्यात महाराष्ट्रातील नागरिक आणि काही बिगर निवासी भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून बेपत्ता नागरिकांचे अनेक नातेवाईक नेपाळच्या दिशेने रवाना होत आहेत. काठमांडू येथील भारतीय दूतावासाने विशेष मदत कक्ष सुरू केला आहे. नेपाळमधील परिस्थितीवर आणि स्थानिक सूत्रांवर लक्ष ठेवून आहोत. महासंघाचे स्वयंसेवक मदतीसाठी तयार आहेत. प्रभावित भाविकांचा शोध घेणे, बचावकार्य आणि मदत पोहोचवण्यासाठी संबंधित प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नेपाळमधील पूर परिस्थितीत अडकलेल्या नातेवाइकांची माहिती ९३२१५८७१४३, १०७० आणि ०२२-२२०२७९९० या हेल्पलाइनवर वा controlroom@maharashtra.gov.in या ई-मेलवर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.