लातूर : पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांत पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असून शेतकरी संकटात सापडला आहे. लातूर शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये सध्या केवळ साडेतेरा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा, अशी आग्रही मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली आहे.
धिरज देशमुख यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत राज्य सरकारकडे ही मागणी केली. अनेक भागांमध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची उदाहरणे समोर आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा बिकट काळात आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. पावसाळ्याच्या उर्वरित दिवसांत ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल, त्या भागांत हा प्रयोग राबवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येऊ शकते. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल याबाबत निश्चित नसले तरी, संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे हा विश्वास देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या शेतकरी डोळ्यात प्राण आणून आभाळाकडे पावसाची वाट पाहत आहे, मात्र पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तमाम बळीराजाच्या वतीने आपण सरकारला साकडे घालत असल्याचे सांगत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने कृत्रिम पावसाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये हा प्रयोग युद्धपातळीवर राबवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.