पुणे : पुण्यात DJ बंदीसाठी आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याच्या घटनेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेबाबत सपकाळ यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला.
“पुण्यात DJ बंदीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण होणे, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे,” असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
“मोदी-फडणवीसांच्या राज्यात सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा कोणत्याही जाती-धर्माचा नागरिक सुरक्षित नाही, हे बापट यांच्यावरील हल्ल्याने पुन्हा सिद्ध झाले आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
पुढे बोलताना सपकाळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. “आता गृहमंत्री फडणवीस ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिका घेतात की हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई करतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार? फडणवीसांनी स्पष्ट करावे,” असे सपकाळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.