जळगाव:- गणेशोत्सवातील डीजेचा वाढता आवाज आणि ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर सातत्याने जनजागृती करणारे अभ्यासक विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी निषेध केला आहे.

आपल्या सोशल मीडिया हँडलवरून खडसे यांनी या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कायदाचं राज्य आहे की नाही ? असं त्या म्हणाल्या. आता काही वेळापूर्वी पुण्यातील डॉल्बी विरोधात बोलणाऱ्या विद्यानंद बापट यांना गुंडांनी मारहाण केली, का ? तर ते डॉल्बी विरोधात बोलतात, सामान्य पुणेकरांना डॉल्बीमुळे होणारा त्रास सांगतात. बापट जे काही बोलत आहेत ते कायद्याला धरुन बोलत आहेत, संविधानाला धरून बोलत आहेत. ज्यांना त्यांचा मुद्दा पटत नसेल तर खोडून काढावा. विचारांना विचारांनी उत्तर द्यावं. पण कोणी तरी भूमिका मांडत आहे म्हणून त्यांना मारहाण करणार का? ही कुठली लोकशाही ? हा सरकार पुरस्कृत अतिरेक कुठे तरी थांबवा ! असे आवाहन त्यांनी केले आहे.