मंडणगड : प्रमुख राज्यमार्ग क्र. १५ अर्थात बाणकोट–पंढरपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडी व झुडपे तातडीने हटवून रस्त्याच्या साईडपट्टीची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या महामार्गाच्या अनेक भागांमध्ये झाडी व झुडपे रस्त्याच्या कडेला वाढल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वळणाच्या ठिकाणी तसेच अरुंद भागांमध्ये झाडीमुळे समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच साईडपट्टी झाडीने व्यापल्यामुळे अचानक वाहन बाजूला घेण्याची वेळ आल्यास वाहनचालकांना अडचणी निर्माण होऊ शकतात.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाहतूक वाढण्याची शक्यता असल्याने प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात आपल्या गावी येणार आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढणार असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली वाढलेली झाडी वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकते.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून प्रमुख राज्यमार्ग क्र. १५ च्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडी व झुडपे हटवावीत, साईडपट्टीची संपूर्ण साफसफाई करावी आणि गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग वाहतुकीस सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देवळेकर यांनी केली आहे.
नागरिक, वाहनचालक तसेच गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कामात कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.