चिपळूण : हिंदूंच्या सण -उत्सवातील महाप्रसाद आणि अन्नदान या प्रक्रियेवर महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षेच्या नावाखाली एकतर्फी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. मंदिरांमध्ये भक्तांच्या देणगीतून व सेवाभावातून चालणारे ‘महाप्रसाद, भंडारे आणि अन्नदान’ ही भारतीय धार्मिक व सामाजिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहे, या धार्मिक उपक्रमांमध्ये अनावश्यक अडथळे निर्माण होणार नाहीत,याची दक्षता शासनाने घ्यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने राज्याचे मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री,राज्यमंत्री, अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांचे नावे असलेले निवेदन चिपळूण येथे प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार श्री गजानन खामकर यांना देण्यात आले.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की,अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्री तुकाराम मुंढे यांनी आगामी गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षेच्या संदर्भात अन्नसुरक्षेच्या काही सूचना जारी केले आहेत. हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमात आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद, भंडारा व अन्नदान यांचा उल्लेख करून परवाने, नोंदणी आणि कारवाईचा इशारा दिला आहे. प्रशासनाची ही भूमिका अत्यंत पक्षपाती आणि संशयास्पद आहे. अन्न सुरक्षेचे नियम जर आवश्यक असतील तर ते धर्म ,पंथ किंवा सण यांचा भेद न करता सर्वांसाठी समानपणे लागू झाले पाहिजेत.मात्र प्रशासनाच्या या निवडक (सिलेक्टिव) कारवाईमुळे हिंदू समाजात तीव्र असंतोष निर्माण होत आहे.
या निवेदनात शासनाकडे मागण्या करण्यात आल्या आहेत
१) सर्व धर्मीय सण- उत्सवातील अन्न वितरणाला समान नियम लागू करावेत
२) सार्वजनिक सण उत्सवांमध्ये श्रद्धेने आणि सेवाभावाने आयोजित केल्या जाणारे अन्नदान हे ‘व्यावसायिक खाद्य विक्री पेक्षा’ वेगळे आहे. त्याला गुन्हेगारी स्वरूप देऊन व्यावसायिक परवान्यांची सक्ती करू नये

आम्ही अन्नसुरक्षेच्या नियमांना विरोध करत नाही, मात्र कायद्याची निवडक अंमलबजावणी करणे हा कायद्याच्या राज्याचा भंग आहे. प्रशासनाने त्वरित या प्रकरणाची दखल घेऊन एफ डी ए ला आवश्यक त्या सूचना द्याव्यात, ‘अन्न सुरक्षेचे नियम सर्वांसाठी समान’ या तत्त्वानुसार कार्यवाही करण्याचे सक्त निर्देश द्यावेत

आणि मंदिरांमध्ये भक्तांच्या देणगीतून आणि सेवाभावातून चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये अनावश्यक अडथळे निर्माण होणार नाहीत ,याची शासनाने दखल घ्यावी.शासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी निवेदन देताना, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संयोजक तथा श्री देव भार्गवराम परशुराम देवस्थानचे विश्वस्त ह भ प अभय महाराज सहस्त्रबुद्धे,श्री संदीप थत्ते ,मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक श्री सुरेश शिंदे ,सावर्डे येथील श्री केदारनाथ देवस्थानचे श्री प्रदीप चव्हाण, श्री संजय चव्हाण, श्री किशोर चव्हाण, चिपळूण बाजारपेठेतील श्री गणपती मंदिराचे प्रतिनिधी श्री. पराग ओक ,चोरवणे येथील श्री रामवरदायिनी देवस्थानचे सचिव श्री प्रवीण सावंत, पोसरे खुर्द येथील श्री जननीमाता देवस्थानचे अध्यक्ष श्री संदीप महापदी, वारेली येथील श्री सुकाई देवस्थानचे श्री दीपक कदम,मानकरी श्री. भिकाजी कदम , निरबाडे येथील श्री रामवरदायिनी देवस्थानचे श्री विलास महाडिक, श्री विजय महाडिक , ढोक्रवली येथील श्री वागदेवी देवस्थानचे श्री. गणपत गावकर, शहरातील श्री देव जुना कालभैरव देवस्थानचे विश्वस्त श्री. समीर शेट्ये, श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचे श्री शालिग्राम विखारे,पेढे येथील श्री हनुमान मंदिराचे प्रतिनिधी श्री जनार्दन मालवणकर ,ओवळी येथील श्री सुकाई देवस्थानचे श्री.मधुकर शिंदे, हिंदू जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ पवार ,विजय सकपाळ , यांचेसह विश्वस्त, हिंदुत्ववादी उपस्थित होते.