मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार असताना झालेल्या पेपरफुटीच्या वेळी रोहित पवार, नाना पटोले, सुप्रियाताई सुळे आणि विजय वडेट्टीवार मूग गिळून गप्प बसले होते. आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर स्वतःचे राजकीय करिअर सेट करण्यासाठी रोहित पवार आणि काँग्रेस विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असल्याचा घणाघात भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रोहित पवार यांचे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम हे पुतना मावशीचे प्रेम आहे. यांना विद्यार्थ्यांच्या करिअरशी काहीही देणेघेणे नाही. यांना विद्यार्थ्यांचे हित महत्त्वाचे असते तर रोहित पवार यांनी आपल्या संस्थेत किती विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले याची आकडेवारी जाहीर करायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कालच एका शिष्टमंडळाची भेट घेत एमपीएससी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. एव्हढेच नाही तर सारथी, बार्टी अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एमपीएससी, यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलती देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. याआधी काँग्रेसच्या काळात कशा परीक्षा घेतल्या जात होत्या, कसे फ्रॉड केले जात होते, विद्यार्थ्यांना साध्या सुविधाही दिल्या जात नव्हत्या, हे विद्यार्थ्यांनी पाहिलेय, असे श्री. बन यांनी सुनावले.
श्री. बन पुढे म्हणाले, एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे, हे रोहित पवारांना माहित नाही. एमपीएससीचे अध्यक्ष, त्यांची सगळी समिती ही स्वायत्तपणे काम करत असते. त्यात काही चुकीचे असेल तर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. औषध निरीक्षकाचा पेपर फुटल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणात गुन्हा दाखल केला, तपास सुरू केला आणि एक्झाम कंट्रोलरपासून सहा लोकांना अटक केली. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. चुकीचे असेल त्याला शिक्षा केली जाईल. परंतु याच्यावरून राजकीय नाटकीपणा करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते अतिशय चुकीचे आहे.
संजय राऊतांना फक्त हिंदूंच्या सणांबद्दल आक्षेप
मोठमोठ्या आवाजात डीजे लावण्याचे समर्थन कुणीही केले नाही. संजय राऊतांना सवाल आहे जेव्हा तुम्ही जनाबगिरी करता आणि जुलूस निघतो त्या जुलूसच्या डीजेचे तुम्ही समर्थन करता. रात्री बारा-बारा वाजेपर्यंत जुलूस निघतो. सायलेन्सर काढलेल्या गाड्यांचे मोठमोठे आवाज मुंबईसारख्या शहरात होतात तेव्हा संजय राऊत तोंडाला पट्टी लावून गप्प बसतात. तेव्हा त्यांना कुठल्याही आवाजाचा त्रास होत नाही. लालबागमध्ये गणपती मिरवणुकीत अंडी फेकली जातात तेव्हा तुम्ही मूग गिळून गप्प बसता. तुम्हाला हिंदू धर्माचा अपमान करायचा आहे. तुम्हाला फक्त हिंदू धर्माबद्दल आक्षेप आहे आणि आम्ही ते जनतेसमोर आणतोय, असे श्री. बन यांनी ठणकावून सांगितले.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. माझा सुप्रियाताईंना सवाल आहे, वांग्यामधून विक्रमी उत्पादन करण्याचा तुम्हाला माहीत असेलला फॉर्म्युला तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिला तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. सरकारने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सवलती दिल्या आहेत आणि देवाभाऊंचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. तुमच्यासारखे एकरभर वांग्याच्या शेतीतून करोडो रुपये कमवायचे, हे धंदे भाजपा करत नाही, अशा शब्दात श्री. बन यांनी त्यांना फैलावर घेतले.
