चिपळूण (विशेष प्रतिनिधी):चिपळूण पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सात आणि सेना-भाजपला सात जागा मिळाल्यामुळे सत्ता कोणाची येणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान ठाकरे सेनेचे चार उमेदवार निवडून आल्यामुळे चिपळूण पंचायत समितीवर आमदार भास्कर जाधव यांच्या मदतीने आ.निकम सत्ता स्थापन करणार का की सेना-भाजप युतीच्या मदतीने राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
चिपळूणमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने युती करून तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढली. त्याचप्रमाणे ठाकरे सेनेनेही स्वतंत्रपणे आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. जिल्हा परिषदेच्या नऊ जागांपैकी तीन शिवसेना,दोन भाजप, ठाकरे सेना एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
त्याचप्रमाणे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, भाजपला तीन, शिवसेनेला चार आणि ठाकरे सेनेला चार जागा असे पक्षीय बलाबल तयार होण्याची शक्यता आहे. दुपारी चार वाजेपर्यंत तरी निकाल अधिकृतपणे जाहीर झालेला नव्हता.
पंचायत समितीमध्ये १८ जागा असल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी दहा जागांची आवश्यकता आहे.सेना भाजपकडे किंवा राष्ट्रवादीकडे सत्ता स्थापन करण्या इतके पूर्ण बहुमत नाही.त्यामुळे महायुती म्हणून सेना भाजपाला राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि ठाकरे सेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का याबाबतही आता चर्चेचा रोख वळू लागला आहे. या संदर्भात दैनिक सागरने आमदार शेखर निकम यांच्याशी थेट संपर्क साधला असता आमदार निकम म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती हा आम्ही बसवणार आहोत. त्यामध्ये कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. ही अट ज्या पक्षाला मान्य असेल त्या पक्षाबरोबर युती केली जाईल. अर्थात महायुती बरोबर जायचे का याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेतील. त्यानुसार आम्ही धोरण ठरवू असे त्यांनी स्पष्ट केले.
तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे बहुमत नसले तरीही राष्ट्रवादी हा आमचा महायुतीतला घटक पक्ष आहे. राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील.
दरम्यान निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकाकी लढत दिली होती आणि त्याच दरम्यान पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले.त्यामुळे चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर सभा, कॉर्नर सभा न घेता केवळ मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला होता. अशा परिस्थितीत आमदार शेखर निकम यांनी एकाकी लढत दिली. राष्ट्रवादीने चांगले यश प्राप्त केले असल्यामुळे आमदार निकम आता पुढे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
