खेड : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत बहिरवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच नूर मोहम्मद हमजा चौगुले यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.

ग्रामसभेदरम्यान बहिरवली गावातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. माजी सरपंच नूर मोहम्मद हमजा चौगुले यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बहिरवली ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली बहिरवली गावात शांतता, सलोखा आणि बंधुभाव अधिक दृढ होऊन गावाच्या विकासाला चालना मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामसभेत सर्वानुमते झालेल्या या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील शांतता, सामाजिक सलोखा, एकोपा आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाते.