मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते कनिष्ठ महाविद्यालय व लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी महाविद्यालय अध्यापनाचे कामकाज चालवून शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कु. वैभवी पवार हिने उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला. एन्. एस्. एस्. प्रतिनिधी प्रथमेश जाधव याने प्राचार्य तर कु. प्रचिती देवकर हिने उपप्राचार्य म्हणून कामकाज पाहिले.
यावेळी सुमारे 30 विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कामकाज सांभाळले. यातून कला विभागात कु. शहद तांबे, वाणिज्य विभागात सुधीर भोसले व विज्ञान विभागात सम्यक सकपाळ तर कनिष्ठ विभागातून कु. सायली भुवड हिची वाणिज्य व कु. आयेशा चोगले हिची विज्ञान विभागातून या विद्यार्थी-शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा. शरिफ काझी, प्रा. प्रितेश जोशी प्रा. वैभवी जोशी, व प्रा. एैश्वर्या कांबळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी श्रावणी मालुसरे, सम्यक सकपाळ, शहद तांबे, वृंदा सुतार, सिमरन महाडीक आदी विद्यार्थी-शिक्षकांनी आपल्या मनोगतात शिक्षकाची भूमिका बजावताना आलेले अनुभव थोडक्यात सांगितले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, ‘‘केवळ वर्गात शिकविणारे शिक्षकच नव्हे, तर ज्यांच्यापासून आपण काही ना काही शिकतो, असे सर्वच आपले गुरू असतात. व अशा सर्वांच्याबद्दल आपल्या मनात कृतज्ञतेची भावना असली पाहिजे. समाजाच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचे मोठे योगदान असल्याने सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदरभाव ठेवला पाहिजे. तसेच समाजात वावरत असताना आपल्या आसपास घडणा-या सर्व चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये आपण डोळसपणे पाहून त्यातून बोध घेतला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते.’’
कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, एन.एस.एस. स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी पवार हिने तर सुदैवी तांबे हिने उपस्थितांचे आभार मानले. एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, प्रा. हनुमंत सुतार, डॉ.महेश कुलकर्णी, डॉ.संगीता घाडगे, प्रा. अशोक कंठाळे, प्रा. महादेव वाघ व एन. एस. एस. प्रतिनिधी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
मुंडे महाविद्यालयात ‘शिक्षक दिन’उत्साहात साजरा..
