रत्नागिरी : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नगर परिषदेकडून दिवस-रात्र काम सुरू आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे ६० टक्के खड्डे भरण्याचं काम पूर्ण झालं असून, गणेशोत्सवापूर्वी उर्वरित काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नगर परिषदेकडून आवश्यक ती कामं हाती घेण्यात आली आहेत. यासोबतच शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन संस्थांशी चर्चा सुरू असून, भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रियाही लवकरच सुरू होणार असल्याचं नगराध्यक्षांनी सांगितलं.

दरम्यान, सध्या स्थगित करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम गणेशोत्सवानंतर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रस्त्यांवर टेम्पो उभे करून फळभाजी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना नगर परिषदेकडून व्यवसायासाठी उपलब्ध करून दिलेल्या मैदानाची माहिती दिली जात आहे. मात्र, त्यानंतरही रस्त्यावरच व्यवसाय सुरू ठेवल्यास कारवाई केली जाणार आहे.

फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन आणि वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र जागा विकसित करण्याचं कामही सुरू आहे. शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने पादचारी आणि इतर वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपली वाहनं योग्य ठिकाणी पार्क करावीत, असं आवाहन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केलं आहे.