मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘ज्याचा विठ्ठल’ या विशेष चित्र-संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले आहे. पांडुरंगाच्या वारीतील भक्तिभाव, संतपरंपरेचा आध्यात्मिक वारसा आणि चंद्रभागेच्या तीरावरील पावन वातावरणाचा कलात्मक अनुभव या कार्यक्रमातून रसिकांना घेता येणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या विचारांनी समृद्ध झालेली वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, भक्ती, मानवता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी जीवनसंस्कृती आहे. या समृद्ध परंपरेचे कलात्मक दर्शन घडविण्याच्या उद्देशाने ‘ज्याचा विठ्ठल’ या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे लेखन डॉ. समीर कुलकर्णी यांनी केले असून दिग्दर्शन अमित वझे यांचे आहे. संगीत संयोजन जयदीप वैद्य आणि निनाद सोलापूरकर यांनी केले आहे. कार्यक्रमातील चित्ररचना प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांनी साकारली असून प्रकाश योजनेची जबाबदारी सुजय भडकमकर यांनी सांभाळली आहे. साहित्य, संगीत, चित्रकला आणि रंगमंचीय सादरीकरण यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमात अंजली मराठे, गजानन परांजपे, अमित वझे, पार्थ उमराणी, केतन पवार, स्वप्नील भावे, ओंकार जोशी, शौनक कुलकर्णी आणि मधुराणी गोखले हे कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांच्या प्रभावी सादरीकरणातून वारकरी संप्रदायातील भक्ती, श्रद्धा, संतवाङ्मय आणि विठ्ठलभक्तीचे विविध पैलू रसिकांसमोर जिवंत होणार आहेत.