मुंबई : गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासीय चाकरमान्यांसाठी यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून विशेष रेल्वे प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ येथून पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ गणेशभक्तांना घेऊन कोकणाच्या दिशेने रवाना झाली. मत्स्य व बंधारे विकास मंत्री श्री नितेश राणे यांच्या माध्यमातून यावर्षी चाकरमान्यांसाठी पाच मोदी एक्सप्रेस सोडण्यात येणार आहेत.
यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल्वेला मार्गस्थ केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील लाखो चाकरमानी आपल्या कुटुंबीयांसह गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी गावी परततात. या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुखकर व्हावा, या उद्देशाने ‘मोदी एक्सप्रेस’चा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यंदा या उपक्रमाचे १४वे वर्ष आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता मनात घेऊन कोकणाकडे निघालेल्या गणेशभक्तांमध्ये यावेळीही मोठा उत्साह पाहायला मिळाला. रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची गर्दी, गणेशभक्तांचा उत्साह आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.
कोकणवासीयांना गणेशोत्सव आपल्या गावी, कुटुंबीयांसोबत आनंदात आणि उत्साहात साजरा करता यावा, यासाठी अशा विशेष प्रवास व्यवस्थेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमाबद्दल हजारो चाकरमान्यांनी मंत्री राणे यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.
गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ ; नितेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा..
