चिपळूण : पर्यावरणाचे संरक्षण आणि ई-वेस्टचे योग्य व्यवस्थापन याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि सह्याद्री निसर्ग मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने ई-वेस्ट संकलन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
मोबाईल, संगणक, टीव्ही, चार्जर, की-बोर्ड, माऊस, प्रिंटर, वायर, बॅटरी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वस्तू आज दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. मात्र, वापरात नसलेल्या किंवा निकामी झालेल्या उपकरणांची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास त्यातील विविध धातू, रसायने आणि इतर घातक घटकांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो.
ई-वेस्टची साध्या कचऱ्यासोबत विल्हेवाट लावण्याऐवजी त्याचे योग्य पद्धतीने संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वापर करणे आवश्यक आहे. ई-वेस्टच्या योग्य व्यवस्थापनामुळे माती, हवा आणि पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासोबतच मौल्यवान धातूंचा पुनर्वापर, ऊर्जा व नैसर्गिक साधनांची बचत आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यास मदत होते.
या अभियानांतर्गत नागरिकांनी त्यांच्या घरातील निकामी इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वस्तू जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ई-वेस्ट घरात साठवून ठेवू नये तसेच सामान्य कचऱ्यात टाकू नये, असे आयोजकांनी सांगितले आहे.
ई-वेस्ट संकलनासाठी डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण येथील रूम क्रमांक ०३ येथे व्यवस्था करण्यात आली आहे. २१ ते ३० सप्टेंबर २०२६दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ई-वेस्ट जमा करता येणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन ई-वेस्ट योग्य ठिकाणी जमा करावा आणि पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : प्रकाश — मोबाईल : ८४४६२३००९०