खेड : खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजय कदम यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कदम यांच्यासह खेड तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यासह दापोली मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
चिपळूण येथील शिक्षक पतपेढी सभागृहात भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक भाजपा प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याच कार्यक्रमात विजय कदम यांच्यासह राजेंद्र निकम, युवराज गुजर, तानाजी पोफळकर, राकेश शिंदे, अविनाश वाडेकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री आमदार निरंजन डावखरे, प्रदेश महामंत्री आमदार योगेश सागर, आमदार प्रमोद जठार, माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजपा नेते ॲड. वैभव खेडेकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विजय कदम यांच्या पक्षप्रवेशामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, आगामी काळात या प्रवेशाचे राजकीय पडसाद उमटण्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः कदम हे रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या जवळचे सहकारी मानले जात असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाकडे राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. खेड तालुक्यातील विविध पदाधिकारी, महिला व युवा मोर्चाचे कार्यकर्ते तसेच विविध सेल आणि प्रकोष्ठांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विजय कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील आणखी काही कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर जाणार का ? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.