खेड : – मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी बौद्धवाडी ब्रिजजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८:५५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणारी दुचाकी आणि विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी यांच्यात कळंबणी बौद्धवाडी ब्रिजजवळ जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील तिघे जखमी झाले. दरम्यान, ड्युटीवर जात असलेले होमगार्ड जवान नवनाथ घोलप यांनी अपघात पाहताच घटनास्थळी थांबून जखमींना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धाम यांची अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध असलेली विनामूल्य रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले. जखमींमध्ये लक्ष्मण राम धोत्रे (३२, मूळ रा. लातूर, सध्या कळंबणी), चंद्रकांत दत्ताराम आग्रे (३१, रा. वीरबंदर, चिपळूण) आणि किरण कृष्णा कलके (२९, रा. वीरबंदर, चिपळूण) यांचा समावेश आहे.