वणौशी (प्रतिनिधी:सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोली यांच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ‘कृषी स्नेही’ गटातर्फे वणौशी येथे अझोला उत्पादनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पशुखाद्यावरील खर्च कमी करून शेतकऱ्यांना पौष्टिक व कमी खर्चातील पूरक पशुखाद्य उपलब्ध करून देणे हा या प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश होता. हे प्रात्यक्षिक शेतकरी श्री. नयन गामरे यांच्या शेतावर घेण्यात आले.

यावेळी ६ फूट लांब, ४ फूट रुंद व १ फूट खोल आकाराचा अझोला उत्पादनासाठी खड्डा तयार करण्यात आला. खड्ड्यामध्ये पाणी गळती होऊ नये यासाठी ताडपत्री अंथरून तिच्या कडा मातीने व्यवस्थित बंद करण्यात आल्या. त्यानंतर खड्ड्यात ७–८ इंच स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये ३ किलो शेण, बारीक मातीचा थर व ३० ग्रॅम एसएसपी यांचे मिश्रण तयार करून सोडण्यात आले. मिश्रण स्थिर झाल्यानंतर निरोगी अझोला कल्चर सोडण्यात आले.

अझोलाच्या चांगल्या वाढीसाठी योग्य पाणीपातळी, अर्धसावली, स्वच्छता व नियमित पोषण व्यवस्थापनाचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. पहिल्या काढणीनंतर २०–३० टक्के पाणी बदलणे, तर ३–४ काढण्यांनंतर खड्ड्यातील संपूर्ण पाणी बदलणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. काढलेले अझोला स्वच्छ पाण्याने धुऊन पशुधनास पूरक खाद्य म्हणून वापरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अझोला हे प्रथिने, खनिजे व जीवनसत्त्वांनी समृद्ध असून गायी, म्हशी व वासरांसाठी पूरक खाद्य म्हणून उपयुक्त आहे. तसेच त्याचा वापर जैवखत किंवा हिरवळीचे खत म्हणूनही करता येतो.

खड्ड्यामध्ये अझोला कल्चर सोडल्यानंतर १५ दिवसांनी अझोला तयार होतो.

या प्रात्यक्षिकाच्या यशस्वी आयोजन व अंमलबजावणीसाठी समृद्धी जाधव, निलम मदने, तन्वी नादिवडेकर, श्रुती बोबडे, साक्षी लोके, अंकिता मुंज, सलोनी सावंत, कोमल झिरवाळ, श्रावणी मोरे आणि आकांक्षा गाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी आवश्यक साहित्याची तयारी, अझोला खड्ड्याची निर्मिती, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेणे आणि शेतकऱ्यांना अझोलाच्या उत्पादन व वापराबाबत माहिती देणे अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.

सदर प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोककुमार चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेष तज्ज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना अझोला उत्पादनाची सोप्या, कमी खर्चाची व शाश्वत पद्धत, तसेच त्याची देखभाल, काढणी व पशुखाद्य म्हणून उपयोग याबाबत प्रत्यक्ष व उपयुक्त माहिती मिळाली.