खेड : गणेशोत्सवाच्या आनंदासाठी चिपळूणच्या दिशेने येणाऱ्या तरुण-तरुणीवर रविवारी सकाळी काळाने घाला घातला. मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी गावानजीक दत्त मंदिरासमोर रविवारी सकाळी सुमारे ६.४० वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती महामार्गालगत तब्बल २५ ते ३० फूट खोल खड्यात कोसळली. या भीषण दुर्घटनेत दुचाकीस्वार सतीश निवृत्ती पाटे (वय २९, रा. पोलादपूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेल्या अक्षता अरविंद कवडे (वय २८, रा. चिपळूण) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश निवृत्ती पाटे आणि अक्षता अरविंद कवडे हे दोघे दुचाकीवरून पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने प्रवास करीत होते. गणेशोत्सवासाठी चिपळूणला येत असताना खवटी गावानजीक दत्त मंदिरासमोर त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी महामार्गाच्या कडेला असलेल्या खोल खड्‌यात कोसळली. या अपघातात सतीश पाटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षता कवडे या गंभीर जखमी झाल्या. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जगगुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधाम यांच्या वतीने भरणे नाका ब्रिजखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी २४ तास कार्यरत असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी अक्षता कवडे यांच्यासह सतीश पाटे यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर सतीश निवृत्ती पाटे यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या अक्षता कवडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रवास सुरू असतानाच हा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उत्सवाच्या आनंदासाठी चिपळूणच्या दिशेने निघालेला प्रवास सतीश पाटे यांच्या कुटुंबासाठी मात्र दुःखद ठरला. तरुण वयात झालेल्या त्यांच्या मृत्यूमुळे पोलादपूर परिसरात शोककळा पसरली आहे.