ओणी : रॅलीस कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीज आणि आदर्श विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, वाटुळ यांच्या संयुक्त विद्यमाने ओणी येथील गजानन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धेत लांजा येथील ‘सावित्रीच्या लेकी मैत्री ग्रुप’ने प्रथम क्रमांक पटकावून देदीप्यमान यश संपादन केले.
पारंपारिक संस्कृतीचे जतन आणि महिला कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक संघानी सहभाग घेतला होता. मात्र, सुरेल गायन, अचूक तालबद्धता आणि पारंपरिक खेळांची उत्कृष्ट सादरीकरण करत ‘सावित्रीच्या लेकी मैत्री ग्रुप’ने उपस्थितांची व परीक्षकांची मन जिंकली.
संघामध्ये सहभागी वीरांगना/कलाकार: या विजेत्या संघात सौ. सुप्रिया कालकर, कु. शिल्पा लांजेकर, सौ. भाग्यश्री पांचाळ, सौ. शिल्पा कुष्टे, सौ. दुर्वा सावंत, सौ. दिपाली गोरड, सौ. स्वाती नाईक, सौ. श्वेता गुरव, सौ. संजना तांबे आणि कु. त्रिवेणी गुरव यांचा सहभाग होता. सर्व सदस्यांनी मंगळागौरीच्या विविध खेळांचे बहारदार सादरीकरण केले.
संगीत साथ ठरली विशेष आकर्षण: या सादरीकरणाला गोड गळ्याच्या गायिका सौ. सुप्रिया तरळ कालकर यांनी आपल्या सुमधुर गायनाने विशेष उंची मिळवून दिली. तसेच अर्जुन कालकर यांनी दिलेली हार्मोनियमची साथ आणि मंदार जाधव यांनी ढोलकीवर वाजवलेला सुरेख ताल यामुळे या सादरीकरणात रंगत आणली.
स्पर्धेतील या घवघवीत यशाबद्दल सावित्रीच्या लेकी मैत्री ग्रुपचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
