चिपळूण : खेर्डी गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध गंभीर व प्रलंबित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवासेनेचे रायगड-रत्नागिरी लोकसभा सरचिटणीस उमेश खताते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासक तथा ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खेर्डी गावातील विविध वाड्या व प्रभागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन उघड्या गटारांमधून अथवा सांडपाण्याच्या पात्रातून जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पटकी, कावीळ, उलट्या-जुलाब यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण गावातील पाणीपुरवठा पाइपलाइनचे तातडीने सर्वेक्षण करून गटारांमधून गेलेल्या पाइपलाइन सुरक्षित मार्गाने स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच खेर्डीमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव हा देखील नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. रात्रीच्या वेळी नागरिक, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना घडत असून दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागल्याने अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे संबंधित विभागाशी समन्वय साधून भटक्या कुत्र्यांचे नसबंदीकरण व लसीकरण करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गावातील रस्ते, गटारे व इतर विकासकामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारीही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. काही विकासकामे पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच उखडली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तक्रार झालेल्या सर्व कामांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांकडून स्वतःच्या खर्चाने कामे पुन्हा दर्जेदार पद्धतीने करून घ्यावीत. वारंवार निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रश्नांवर ग्रामपंचायतीने तातडीने ठोस कार्यवाही न केल्यास युवासेनेच्या वतीने पुढील आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतांना उमेश खताते यांच्यासह दीप्ती सावंत देसाई, विजय शिर्के, ईगबाल बेबल, समीर कदम, पल्लवी चव्हाण, मोहन खेडेकर, संतोष मिरगल, ओमकार जंगम, विराज खताते, गणेश धुरी आणि शंकर सावंत देसाई उपस्थित होते.