चिपळूण : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवामहोत्सवाच्या २०२६–२७ या शैक्षणिक वर्षातील उत्तर रत्नागिरी विभागाची विभागीय फेरी (झोनल राउंड) जीआयटी घरडा महाविद्यालय, लवेल येथे उत्साहात पार पडली. या विभागीय फेरीत डी. बी. जे. महाविद्यालय स्वायत्त, चिपळूणच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ७ प्रथम, ४ द्वितीय, २ द्वितीय व ३ उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त करत तब्बल १६ कलाप्रकारांत यश संपादन करत विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीसाठी दिमाखदार प्रवेश निश्चित केला.

ललित कला विभागात डी. बी. जे.च्या विद्यार्थ्यांनी विशेष ठसा उमटवला. रांगोळी व मातीकाम या दोन्ही कलाप्रकारांत सुदेश सुतार याने प्रथम क्रमांक पटकावला. कोलाजमध्ये वैष्णवी गीते हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर व्यंगचित्रामध्ये तिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. पोस्टर निर्मितीत स्विती प्रजापती हिने द्वितीय क्रमांक मिळवला.

साहित्य विभागातही विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. इंग्रजी कथाकथनात शगुफ्ता गोलंदाज व मराठी कथाकथनात साईदास राजशिर्के यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. वादविवाद स्पर्धेत गुलजार वरवटकर आणि मिथिल लक्ष्मीकैशव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. इंग्रजी वक्तृत्वात गुलजार वरवटकरने द्वितीय, तर मराठी वक्तृत्वात आर्यन दळवी याने तृतीय क्रमांक मिळवला.

नाट्य विभागात डी. बी. जे.च्या विद्यार्थ्यांनी विशेष वर्चस्व गाजवले. एकपात्री अभिनयात पृथ्वी मोहिते हिने तृतीय क्रमांक मिळवला. मराठी प्रहसनात श्रीराम महाडिक, साक्षी संकपाळ, वेदांत वक्ते, रुतांश कदम, श्रीराम देवळेकर आणि राज जाधव यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. मूकाभिनयात सई गोरीवले, सुशील कांबळे, रेवती शिंदे, वेदांत वक्ते, हिमानी खेडेकर आणि जान्हवी शिगवण यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मराठी एकांकिकेत सई गोरीवले, श्रीराम महाडिक, रुतांश कदम, पृथ्वी मोहिते, प्रशील पवार, सानिया नरळकर आणि वेदांत वक्ते यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत अंतिम फेरी गाठली.

संगीत विभागात भारतीय समूहगीतानेही महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला. अनिश अडविलकर, रुचिता दीक्षित, श्रीशैल जाधव, वैष्णवी महाकाळ, रितेश सुतार आणि वरद बेडेकर यांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. भारतीय लोकनृत्यात राज जाधव, रुतांश कदम, सुशील कांबळे, तन्मय हातखांबकर, श्रीराम महाडिक, शान महालदार, पार्थ पारकर, वेदांत वक्ते , प्रशील पवार आणि पुर्वेश नामगुडे यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.