लांजा : (गोविंद चव्हाण) : लांजा तालुक्यातील आगरवाडी येथील सुप्रसिद्ध वारकरी मंडळाने देहू–आळंदी वारी केली. अधिक मास या महिन्याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक तीन वर्षांनी एक अधिक महिना येतो. यावेळी ज्येष्ठ महिना आल्याच्या निमित्ताने आगरवाडीतील वारकरी मंडळींनी देहू–आळंदी यात्रा करून आल्यानंतर यात्रेची सांगता केली.
संत तुकाराम महाराज मंदिर, आगरवाडी येथे नुकतीच हरिपाठ व कीर्तनाने सांगता करण्यात आली. पालू येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रामदास नामे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कीर्तनात नामे महाराज यांनी उपस्थित सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक व नियोजक ह.भ.प. दर्शन आग्रे, ह.भ.प. दीपक रामाणे, कुलदीप आग्रे, निषाद आग्रे, राजाराम करंबेळे, वसंत आग्रे, तुकाराम घडशी, नारायण पालये, सागर रामाणे, ज्योती रामाणे, पूजा आग्रे, पल्लवी गुंडये, सुनिता कवचे, श्रेया आग्रे, मधुरा रामाणे, आरोही रामाणे, रोहन गुंडये, प्रभाकर गुंडये व त्यांचे सहकारी होते.
लांजा तालुक्यातील आगरवाडी येथील वारकरी मंडळींच्या या समूहामध्ये सुमारे साठ ते पासष्ट जणांचा समावेश आहे. हरिवरकरी ग्रुप सातत्याने हरिपाठ करत असून, त्यामुळे हा समूह परिसरात सुप्रसिद्ध झाला आहे व चांगल्या नावारूपाला आला आहे.