मुंबई : जनता दरबार म्हटले की अजितदादा पवार हे समीकरण होऊनच गेले होते. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी जनता दरबार घेऊन जनतेसमोर अजितदादांचा लोकांच्या कामाप्रती असलेला दृढ विश्वास अधोरेखित केल्याचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पाहायला मिळाले.

जनता दरबारासाठी आज (मंगळवार) अख्ख्या महाराष्ट्रातून नागरिक आपल्या समस्या, अडचणी तसेच गावांतील विकासकामांबाबतच्या मागण्या घेऊन आले होते. काहीजण विविध संस्थांना येणाऱ्या अडचणींसंदर्भात शिष्टमंडळासह उपस्थित होते. या सर्वांना भेटत, त्यांच्या अडचणी समजून घेत आणि त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दूरध्वनी करण्याच्या सूचना देत सुनेत्रा अजित पवार यांनी आज अजितदादांची कार्यशैलीच जणू साकार केली.

सकाळी देवगिरी बंगल्यावर भेटीगाठी झाल्यानंतर आणि दुपारी मंत्रिमंडळाची बैठक आटोपून सुनेत्रा अजित पवार या दुपारी तीन वाजता प्रदेश कार्यालयात दाखल झाल्या. जवळपास पावणे तीन तास त्यांनी जनता दरबारासाठी आलेल्या नागरिकांची गाऱ्हाणी ऐकली, त्यांच्या समस्यांचे निराकरण केले आणि निवेदने स्वीकारली. तसेच, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उर्वरित नागरिकांना भेटून त्यांची निवेदने स्वीकारली. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही वेळ देत त्यांच्या निवेदनांची दखल घेतली. सुनेत्रा अजित पवार यांनी आजच्या जनता दरबारातून अजितदादांना अभिप्रेत असलेले जनतेकेंद्रित कार्य आणि जनतेच्या मनात दादांविषयी असलेल्या विश्वासाला बळ देत तितक्याच सहजतेने जनतेची मने जिंकली.