रायगड : सामाजिक बांधिलकी जपत मानवतेची सेवा करणाऱ्या मावळा प्रतिष्ठानच्या कार्याचे समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी भरभरून कौतुक केले. वाकृळ (ता. पेण) येथे आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या गजर-कीर्तन सोहळ्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अलोट गर्दी केली.

कीर्तनातून इंदुरीकर महाराजांनी आजच्या समाजातील वास्तवावर परखड भाष्य करत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिले. युवक-युवती, महिला तसेच पालकांना योग्य दिशा देत त्यांनी, “शिक्षण, संस्कार आणि आरोग्य हीच खरी संपत्ती आहे,” असे अधोरेखित केले.

जिल्हा परिषद शाळा वाचविण्याचे आवाहन करताना त्यांनी शाळा परिसरात मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली. तसेच आई-वडील व गुरुजन यांचा सन्मान राखण्याचे महत्त्व सांगत, व्यसनमुक्त समाजच सक्षम राष्ट्र घडवू शकतो, असा संदेश दिला. आर्थिक संपत्तीपेक्षा संस्कारक्षम मुले हीच कुटुंबाची खरी संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले.