पुणे : शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत आहे. कांद्याला प्रति किलो दोन रुपयांचाही दर मिळत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी संघर्ष करत राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा, कमी भावात विकलेल्या कांद्याला अनुदान द्यावे, शेतकऱ्यांचा सर्व कांदा नाफेडमार्फत खरेदी करून त्यांना न्याय द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीने पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांकडून धरपकड सुरू असतानाही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, खा. निलेश लंके, आ. बापूसाहेब पठारे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार बाबाजी काळे, माजी आ. अशोक पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
