चिपळूण : कोकण रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चिपळूण जवळील खेर्डी (बाजारपेठ) परिसरात पावसाच्या पाण्याचा तसेच सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने, सध्या तेथे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी खेर्डी येथील स्थानिक ग्रामस्थांनी थेट कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

काय आहे मुख्य समस्या?

पाण्याचा मार्ग रोखला: रेल्वे किलोमीटर १३१/५०० – ६०० पूर्व भागातून रेल्वेने १९९१ पासून पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग ठेवला होता. या भागात अनेक वर्ष जुनी लोकवस्ती आहे. या परिसरात मिरगल चाळ, विठ्ठलवाडी आणि बाजारपेठ खेर्डी हा भाग येतो. पूर्वीपासूनच येथील पावसाचे व गटारांचे पाणी पूर्वेकडून सखल भागाकडे जात आहे. यासाठी रेल्वे प्रशासनानेही मार्ग ठेवला आहे मात्र रेल्वे प्रशासनाने आजतागायत या भागातील पाण्याच्या मार्गाची योग्य साफसफाई केलेली नाही. त्यामुळे पावसाचे व सांडपाणी तिथेच तुंबून राहत आहे. त्यातच काहिनी त्याच्या तोंडाशी मातीचा भराव करुन गार्डन केल्याने पाण्याचा निचरा होण्याचा मार्गच बंद केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित हा मार्ग मोकळा करुन पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होईल यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.