नवी दिल्ली : महाकारुणीक भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली त्या बुध्दगया मधील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे सर्वोच्च जागतिक श्रध्दास्थान आहे. त्यामुळे महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौध्दांच्या ताब्यात आले पाहिजे. महाबोधी महाविहारचे सर्व ट्रस्टी आणि चेअरमन हे बौध्दच असले पाहिजे..! ही देशभरातील बौध्दांची मागणी आहे. या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम .रामदास आठवले यांच्या नेतृत्वात बौद्ध भिख्खु संघाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज भेट घेतली. नवी दिल्लीत 6-A कृष्णा मेनन मार्ग येथील निवासस्थानी नाम . रामदास आठवले यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी नाम. रामदास आठवले यांच्यासोबत पुज्य भंते करुणानंद महाथेरो, भंते डॉ.राहुल बोधी महाथेरो, भंते थेरो ज्योती, भंते आनंद आदिंचा या शिष्टमंडळात समावेश होता.
महाबोधी महाविहारच्या व्यवस्थापन ट्रस्टमध्ये चेअरमन आणि सर्व मेंबर हे बौध्द धर्मीय असले पाहिजे बौध्दांची मागणी कोणत्याही धर्माविरुध्द नाही. बौद्ध धम्माच्या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे बौध्दांकडेच असले पाहिजे त्यासाठी बिहार विधानसभेचा 1949 चा जो महाबोधी विहार टेंपल ऍक्ट आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. देशभरातील बौध्दांची महाबोधी महाविहार मुक्तीची मागणी आहे. महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन आणि विश्वस्त हे सर्व बौध्दच असले पाहिजे..! ही देशभरातील बौध्दांची मागणी आहे. या मागणीचा विचार करुन भारत सरकारने योग्य निर्णय घेऊन महाबोधी महाविहार हे बौध्दांच्या ताब्यात दिले तर देशभरात भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारबाबत एक चांगला संदेश जाईल. देशभरातील बौध्द जनता या निर्णयाने आनंदीत होईल. त्यामुळे आपण स्वतः यात लक्ष देवुन महाबोधी महाविहारचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नाम . रामदास आठवले यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.
महाबोधी महाविहारचा इतिहास आणि आजच्या सद्यस्थितीत असणा-या बौध्दांच्या मागणीबाबत नाम. रामदास आठवले यांनी गृह मंत्री अमीत शहा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी महाबोधी महाविहार व्यवस्थापन बौध्दांच्या ताब्यात जाण्याबाबतचा सर्व इतिहास आणि या प्रकरणातील संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. आपण याबाबत अभ्यास करुन निर्णय घेेऊ असे आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी नाम. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भेटलेल्या बौध्द भिख्खुंच्या शिष्टमंडळाला दिले.
महाबोधी महाविहार हे बौध्दांच्या ताब्यात देण्याबाबत नाम . रामदास आठवले यांनी यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नाम. रामदास आठवले यांनी पत्र लिहुन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाबाबत बौध्दांच्या शिष्टमंडळाला भेट देण्याबाबत विनंती केली होती. त्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नाम . रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील बौध्दांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यावी याबाबत कळविले होते. प्रधानमंत्री मोदी यांच्या सुचनेनुसार आज नाम .रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील बौध्दांच्या शिष्टमंडळाची गृहमंत्री अमित शहा यांचीं भेट घेवुन महाबोधी महाविहाराचा प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा केली.