भिवंडी : शहरातील कासारआळी परिसरात दीपक घंट्याळ यांच्या कुटुंबीयांनी आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा आकर्षक आणि हुबेहूब देखावा साकारला आहे. भिवंडी तालुक्यातील मराठे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची प्रतिकृती या देखाव्यात उभारण्यात आली असून मंदिराभोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे.

शिवरायांच्या इतिहासातील विविध प्रसंगांचे देखावेही याठिकाणी उभारण्यात आले आहेत. हा संपूर्ण देखावा साकारण्यासाठी कुटुंबीयांना तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला. पर्यावरणपूरक पद्धतीने साकारलेल्या या देखाव्यात शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली असून, हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.