दापोली (सागर गोवळे) : तालुक्यातील बोरिवली आडीवाडी गावात यंदाचा गणपती विसर्जन सोहळा अत्यंत उत्साहात, वाजत-गाजत आणि ढोल-ताशांच्या गजरात पार पडला. मुंबई-पुण्याहून खास या सोहळ्यासाठी आलेले चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थ रस्त्यावर उतरून टिपरीच्या तालावर आणि गुलालाची उधळण करत गाण्यांवर धुंद होऊन नाचले. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीने संपूर्ण परिसरात एक वेगळाच उत्साह भरून राहिला होता.
​गावातील गणपती बाप्पाचे विसर्जन नेहमीप्रमाणे पंचनदी धरणाच्या जलाशयात करण्यात आले. मात्र, यंदाच्या विसर्जन सोहळ्याचे सर्वात मोठे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे पंचनदी धरणाच्या पाण्यात लावलेले दहीहंडीचे थर!
​धराच्या पाण्याच्या मधोमध तरुणांनी अतिशय जिद्दीने आणि कौशल्याने रचलेले हे थर उपस्थितांचे डोळे दीपवून टाकणारे होते. पाण्यात असा थरारक आणि शिस्तबद्ध दहीहंडीचा प्रयोग पाहण्यासाठी धरणाच्या कडेला ग्रामस्थांनी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण पंचनदी धरणाचा परिसर दुमदुमून गेला.
​पाण्यात रचलेल्या या अभूतपूर्व दहीहंडीच्या थरांची चर्चा आता संपूर्ण दापोली तालुक्यात आणि सोशल मीडियावर रंगली आहे. बोरिवली आडीवाडीच्या तरुणाईने जपलेली ही अनोखी परंपरा आणि दाखवलेले धाडस सर्वांचे कौतुक मिळवत असून, हा सोहळा यंदाच्या गणेशोत्सवातील सर्वात सुंदर आणि झक्कास क्षण ठरला आहे.