रायगड : मुंबई गोवा महामार्गावर महाड नजीक केंबुर्ली गावाजवळ गोव्यावरून गुजरात कडे जाणाऱ्या एका ट्रक मध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला. माहिती मिळाल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावर सापळा रचण्यात आला. कारवाई दरम्यान या ट्रकमध्ये १४८० मद्य बाटल्यांचे बॉक्स आढळून आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावर सोमवारी दुपारी एका ट्रक मधून गोवा बनावटीचे मद्य गोव्याकडून गुजरातकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. ट्रॅक क्रमांक आर. जे. १९ जी. ई. ४११५ या ट्रक मधून हा साठा जात होता. माहिती मिळताच महामार्गावर सापळा रचण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास सदर ट्रक मुंबईच्या दिशेने जात असताना केंबुर्ली गावाजवळ आला असता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईलने ट्रॅक पकडला. ट्रॅक मध्ये १४८० बॉक्स असल्याचे आढळून आले. यामध्ये असलेल्या गोवा बनावटीच्या व्हिस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजारात याचे मूल्य एक कोटी एकोणपन्नास लाख अठरा हजार चारशे रुपये आणि ट्रॅक दहा लाख तर मोबाईल आठ हजार असा एकूण १ कोटी ५९ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रॅक चालक प्रभुलाल भवरलाल सालवी असे असून त्याला देखील अटक करण्यात आले आहे.
सदर पथकात दुय्यम निरीक्षक एस.पी. पीसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक निमेश नाईक, जवान मनोज गायकवाड, ज्ञानेश्वर पोटे, महिला जवान रचना मोहिते, यांचा समावेश आहे.