लोटे : – समाजात क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या राज्यातील विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला राज्यस्तरीय ‘महाराष्ट्ररत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६’ रविवारी, २७ सप्टेंबर रोजी पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील घाणेखुंट गावचे सरपंच श्री. संतोष उर्फ राजू ठसाळे यांना महाराष्ट्ररत्न आदर्श सरपंच पुरस्कार देऊन संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह,मानपत्र आणि पदक असे होते.
सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या सोहळ्यात सामाजिक, राजकीय, आरोग्य, कला, शिक्षण, उद्योग आणि कृषी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट असोसिएशनचे अध्यक्ष मा. नितीन दवणे सर, ए.आर.जे. एशिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन मा. जितेंद्र तुळशीराम दाते आणि वृक्ष अभ्यासक व नर्सरी तज्ज्ञ वंदना जाधव उपस्थित होत्या.
घाणेखुंट गावचे सरपंच श्री. राजू ठसाळे यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना यंदाचा महाराष्ट्ररत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यातील आदर्शवत काम करणाऱ्या सरपंच यांना गौरविण्यात आले, यात खेड तालुक्यातील घाणेखुंट गावातील श्री. राजू ठसाळे यांचा विशेष महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच म्हणून सन्मान करून गौरव करण्यात आला. त्यांनी आजवर केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी ने केलेला देशपातळीवरचा गौरव, आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, बचत गटांना केलेले सहकार्य, शैक्षणिक मोफत दाखले, पर्यावरणपूरक उपक्रम, पथदिवे, रस्ते, सार्वजनिक व्यवस्था, शाळा, अंगणवाडी व दिव्यांगांना मदत म्हणून दिलेले स्वतःचे मानधन, विमा व १०० हुन अधिक लोकांना दिलेले शासकीय पेन्शन योजना लाभ व अशा असंख्य केलेल्या उल्लेखनीय कार्याचा मागोवा घेत सन्मानित करण्यात आले. सदरचा उपक्रम पुणे येथील नालंदा ऑर्गनायझेशन ने आयोजित केला होता, यात घाणेखुंट गावचे नाव राज्यस्तरावर गेले हे विशेष.या त्यांच्या सन्मानामुळे घाणेखुंट गावासहीत संपूर्ण खेड तालुक्याच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला गेला आहे.