खेड : तालुक्यातील मौजे वाडी मालदे, ग्रुप ग्रामपंचायत नांदिवली, येथील मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कमी दाबाच्या वीज समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. डिपीडीसी अंतर्गत नवीन ११ के.वी. लाईन व ६३ केवीए डिटीसी विद्युत रोहित्र तसेच उच्चदाब वाहिनी उभारणीचे काम पूर्णत्वास आले असून गावाच्या विकासाच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक बाब ठरली आहे.
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, पर्यावरण मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या मार्गदर्शनामुळे व केलेल्या शिफारशीमुळे वाडीमालदे गावातील अनेक वर्षांपासूनची कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लागली आहे.या प्रकल्पामुळे ग्रामस्थांना भविष्यात वाढणाऱ्या वीज गरजेनुसार अधिक विश्वासार्ह वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार असून, वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी कमी होण्यास हातभार लागणार आहे.
जल जीवन मिशनच्या नळपाणी योजनेलाही मिळणार चालना
मालदे गावातील जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना गेल्या दोन वर्षांपासून कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बंद होती. नवीन विद्युत डीपी व उच्चदाब वाहिनी उभारणीमुळे या योजनेला आवश्यक विद्युत पुरवठा उपलब्ध होऊन गावातील नळपाणी योजना प्रत्यक्षात सुरळीतपणे सुरू होण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय नवीन विद्युत व्यवस्था उपलब्ध झाल्यामुळे शेती, रोजगार, नवीन घरबांधणी, पारंपरिक धार्मिक कार्यक्रम, हरिनाम सप्ताह, शिमगा, लग्नसराई तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार आहे.
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश
या कामाची सुरुवात वाडीमालदे गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते संतोष शांताराम चव्हाण यांनी दिनांक ०७/०२/२०२४ रोजी केलेल्या अर्जाद्वारे केली. त्यानंतर सदर कामास मंजुरी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व विविध स्तरांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. मंत्रालय, मुंबई येथील नियोजन विभाग, मा. मुख्य सचिव, मा. मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. ऊर्जा राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी तसेच महावितरणच्या संबंधित अधिकारी व कार्यालयांकडे मागील अडीच वर्षांपासून सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात आला.गरज भासल्यास संविधानिक अधिकारांचा वापर करून आमरण उपोषणाच्या तयारीसह लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची भूमिका घेण्यात आली. अखेर या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळून सदर कामास **जावक क्र. जीनिस का-२/जीवायो/प्रत्रा/९९२/२६, दिनांक 09/03/2026 अंतर्गत तांत्रिक व प्रशासकीय रक्कम रुपये 2159702 मान्यता प्राप्त झाली.
त्यानंतर Letter of Award for Supply, Installation of Plant & Equipment and Civil Work अंतर्गत सदर कामाची ऑर्डर दिनांक ०४ जून २०२६, Ref. No. 02632 रोजी देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष कामाची सुरुवात दिनांक ०५ जून २०२६ रोजी M/s Kranti Electricals & Co. यांच्या माध्यमातून करण्यात आली. इस्टिमेटनुसार नवीन ३७ पोल, नवीन ६३ KVA विद्युत रोहित्र, चैनल, अँगल व आवश्यक विद्युत उपकरणांची उभारणी करण्यात आली. अखेर गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला, रविवार दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवीन ११ KV Line व ६३ KVA DTC प्रकल्पाचे काम पूर्ण झाले.त्याच दिवशी वाडीमालदे ग्रामस्थ मंडळ तसेच मुंबई व पुणे ग्रामस्थ मंडळ यांच्या शुभहस्ते या विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
हा केवळ विद्युत प्रकल्प नाही; हा गावच्या विकासाचा आणि एकजुटीचा विजय !
नवीन विद्युत प्रकल्पामुळे वाडी मालदे ग्रामस्थांना अधिक विश्वासार्ह वीजपुरवठा, कमी तांत्रिक अडचणी आणि भविष्यातील वाढत्या वीज गरजांसाठी सक्षम विद्युत व्यवस्था उपलब्ध झाली आहे. हा केवळ एका विद्युत रोहित्राचा किंवा उच्चदाब वाहिनीचा प्रकल्प नसून, गावच्या विकासाचा, ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाचा विजय आहे.ग्रामस्थांनी दिलेला विश्वास, जबाबदारी आणि सहकार्य यांचा मानसन्मान राखत सातत्यपूर्ण पाठपुरावा, अथक प्रयत्न आणि विकासाची प्रामाणिक बांधिलकी यांच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास नेण्यात आले आहे. या संपूर्ण कामासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात पाठिंबा, सहकार्य व विश्वास देणारे वाडी मालदे ग्रामस्थ मंडळ, मुंबई व पुणे ग्रामस्थ मंडळ यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व आभार मानण्यात येत आहेत.
