रायगड : जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेतील विकासकामांच्या नावाखाली कथित ₹100 कोटींच्या गैरव्यवहाराच्या आरोपांवरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळलाये . सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका सानिया मोहसीन शेख यांनी याप्रकरणी पुन्हा एकदा रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज देत या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
नगरपरिषदेच्या प्रशासकीय राजवटीच्या काळात विविध विकासकामे, सुशोभीकरण, उद्याने, हायमॅक्स, प्रशासकीय बांधकामे तसेच इतर कामांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप सानिया शेख यांनी केला आहे. यापूर्वी त्यांनी या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली होती.
दरम्यान, खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आरोप निराधार असल्याचे सांगत सानिया शेख यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगराध्यक्षांकडूनही आरोप फेटाळण्यात आल्याचे वृत्त आहे.मात्र, मानहानीचा दावा दाखल झाल्यानंतरही सानिया मोहसीन शेख आणि मोहसीन शेख यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. “कितीही मानहानीचे दावे दाखल केले तरी आम्ही घाबरणार नाही. जनतेच्या पैशांची लूट होऊ देणार नाही. या प्रकरणात शेवटपर्यंत लढू,” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणाची चौकशी कोणत्या पातळीवर होते, आरोपांमागील कागदपत्रे आणि वस्तुस्थिती काय आहे, तसेच प्रशासनाकडून पुढील काय कारवाई केली जाते, याकडे खोपोलीकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ₹100 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप अद्याप सिद्ध झालेला नसून, त्याची सत्यता अधिकृत चौकशी आणि संबंधित कागदपत्रांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.