मुंबई : कांदिवली येथील मे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील गेली ७० वर्षे कार्यरत असलेल्या मान्यताप्राप्त महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या सरचिटणीसपदी आमदार प्रसाद लाड यांनी आज पदभार स्वीकारला. युनियनच्या निवडणुकीत श्रमिक उत्कर्ष सभेच्या नेतृत्वाखालील पॅनेलला कामगारांचा व्यापक पाठिंबा मिळाल्यानंतर ही नवी जबाबदारी आमदार लाड यांच्यावर सोपविण्यात आली.

श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष म्हणून आमदार प्रसाद लाड गेल्या काही वर्षांपासून कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. कामगारांचे प्रश्न प्रशासनाच्या पातळीवर मांडणे, संबंधित यंत्रणांशी संवाद साधणे आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, या माध्यमातून त्यांनी कामगार क्षेत्रात आपली भूमिका अधिक सक्रिय केली आहे. BEST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबतही त्यांनी विधान परिषदेसह विविध स्तरांवर पाठपुरावा केला असल्याचे वृत्तांत नोंदवले गेले आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनला दीर्घ आणि समृद्ध कामगार चळवळीची परंपरा लाभली आहे. अनेक ज्येष्ठ कामगार नेत्यांनी या संघटनेचे नेतृत्व केले आहे. अशा ऐतिहासिक संघटनेची जबाबदारी मिळणे हा माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठा विश्वास आणि जबाबदारी आहे, अशी भावना आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केली.

“गेली पाच वर्षे श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मार्गी लावताना कामगारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याच विश्वासाची ही जबाबदारी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील हजारो कामगारांच्या हिताचे संरक्षण करतानाच कंपनीचा विकास आणि कामगारांचे कल्याण यांचा समतोल साधण्यासाठी आपण कटिबद्ध राहू. कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करू,” असे आमदार लाड यांनी सांगितले.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कांदिवली येथील कारखान्यात सुमारे ६ ते ६.५ हजार कामगारांना रोजगार मिळत असून, या कामगारांच्या रोजगाराची सुरक्षितता, कल्याणकारी सुविधा, सेवा-संबंधित प्रश्न आणि भविष्यातील संधी यासाठी युनियनच्या माध्यमातून सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका घेण्याचा निर्धार आमदार लाड यांनी व्यक्त केला.

यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह श्रमिक उत्कर्ष सभेचे भालचंद्र साळवी, बाबा कदम, अध्यक्ष सुहास गोरे, रोहित केणी, महेश सावंत, श्रीकांत शेट्टी, संजय दरेकर, अमेय लाड, माणिक मोरे, देवेंद्र खैरे तसेच युनियनच्या कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार सहकारी उपस्थित होते.