चिपळूण : शहरातील पेठ माप परिसरातील विश्वदर्शन केबल येथे गुरुवारी (१ ऑक्टोबर) लोकवस्तीत मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. स्थानिक नागरिक रूपेश पवार यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच चिपळूण वन विभागाचे वनरक्षक राहुल गुंठे (रामपूर) व वनरक्षक कृष्णा इरमले (कोळकेवाडी), तसेच बचाव पथकातील अजय बडदे आणि अथर्व घाग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने मगरीची पाहणी करून कोणतीही इजा होणार नाही, याची दक्षता घेत सुरक्षितपणे तिचे बचावकार्य केले.
बचावानंतर मगरीची प्रकृती सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियांका लगड, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान आणि वनपाल एस. एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.