चिपळूण : चिपळूण शहरातील रस्त्यांची पुन्हा एकदा खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत चिपळूणच्या माजी उपनगराध्यक्ष तथा ठाकरे सेनेचे नेते बाळा कदम यांनी नगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

सन्माननीय मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व चिपळूण नगरपालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक आपणा सर्वांच्या आदरणीय पालकांची आठवण काढत काढत हा त्रास सहन करीत आहेत, असा उपरोधिक टोला कदम यांनी लगावला आहे.

नवीन रस्ते आणि प्रलंबित निधी याबाबत नेहमीच बोंबाबोंब सुरू असते. मात्र, तूर्तास नवीन रस्त्यांचा विषय बाजूला ठेवून फक्त रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे काम करावे, अशी मागणी बाळा कदम यांनी केली आहे.