लोटे :- रोटरी क्लब ऑफ लोटे यांचे वतीने यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल बोरज तालुका खेड चे सहाय्यक शिक्षक श्री विजय बाबुराव पाटील यांना नुकताच एका छोट्या आणि कार्यक्रमात देण्यात आला. सप्टेंबर महिन्यात असलेल्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार रोटरी क्लबच्या वतीने देण्यात येतो.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती सप्टेंबर महिन्याच्या पाच तारखेला असते. तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून देशभरातील सर्व रोटरी क्लब आपापल्या कार्यक्षेत्रात एक आदर्श शिक्षक पुरस्कार देतात. हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश म्हणजे शिक्षकांनी अतिशय तळमळीने देशाची भावी पिढी घडविण्यासाठी केलेले कष्ट आणि ज्ञानदानासारखे केलेले पवित्र कार्य याचा गौरव करणे आणि त्याचबरोबर इतर शिक्षकांना त्यापासून प्रेरणा घेऊन आपले कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणे असा आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल बोरज येथील सहाय्यक शिक्षक श्री विजय बाबुराव पाटील हे या शाळेच्या स्थापनेपासून म्हणजे सुमारे 35 वर्षे या शाळेत सेवा देत असून येथील विद्यार्थी आणि पालकांबरोबर त्यांचे अतिशय आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. त्यांची ही शिक्षण क्षेत्रातील एवढ्या वर्षांची सेवा लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ लोटे ने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा योग्य सन्मान केला आहे, असे मत पंचक्रोशीतून व्यक्त होत आहे. हा पुरस्कार प्रदान करताना रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संदीप सुर्वे, रोटरी विकास ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष रहाटे, इनरव्हील क्लब अध्यक्षा सौ श्रावणी सुर्वे, रोट्रॅक्ट क्लब ऑफ लोटे चे माजी अध्यक्ष तुषार खताते, न्यू इंग्लिश स्कूल बोरज च्या मुख्याध्यापिका सौ कदम मॅडम, पवार मॅडम,श्री नागरगोजे सर,श्री शिंदे सर,श्री भूषण घोसाळकर तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
न्यू इंग्लिश स्कूल बोरज चे शिक्षक विजय पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित….
