गुहागर : पर्यटन केंद्रबिंदू म्हणून पुढे येत असलेल्या गुहागरात सलग आलेल्या सुट्ट्यामुळे पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा हा गुहागर तालुक्यात आहे. अथांग सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे गुहागरचे प्रमुख आकर्षण आहे. गुहागर शहराला लाभलेल्या समुद्रकिनारा तब्बल सात किलोमीटर लांब आहे.
तालुक्यात अनेक धार्मिक पर्यटनस्थळ देखील आहेत. भगवान शंकरांचे वास्तव्यस्थान ‘गुह्यवन’ म्हणून गुहागर ओळखले जाते. दगडी बांधणीचे व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत आहे. दशभूज गणेशाचे मंदिर देखील तितकेच लोकप्रिय आहे. तालुक्यात पर्यटन हंगामात दिवसाला मोठया संख्येने पर्यटक येत असतात. गणेशोत्सवानंतर आलेल्या सलग सुट्यामुळे पुणे, मुंबईसह घाटमाथ्यावरून अनेक पर्यटक आले आहेत. शहरात राहण्याची निवासे कमी पडली असे चित्र दिसतं होते. शुक्रवारी सायंकाळी आलेले पर्यटक राहण्याच्या व्यवस्थेसाठी सर्वत्र फिरताना दिसतं होते. यामध्ये सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या जास्त होती.
निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी लाभलेल्या गुहागरची ओळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरासह प्रेक्षणिय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठया संख्येने येत असतो. सायंकाळी गुहागर चौपाटीवर समुद्रातील बोटीग, घोडागाडी, खाद्य पदार्थांचे स्टॉलवर गर्दी केलेली दिसतं होती.
दरम्यान, आलेले पर्यटक आंघोळीसाठी पाण्यात जात असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नगरपंच्यायतीचे सुरक्षा रक्षक तैनात होते. तसेच गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर हे स्वतः आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन किनारपट्टीला ग्रस्त घालतं होते.
