मुंबई : मतदार याद्यांच्या विस्तृत पुनरीक्षणाच्या (Intensive Revision) प्रक्रियेला भारताच्या निवडणूक व्यवस्थेत अनेक दशकांचा इतिहास आहे. मतदार याद्या अधिक अचूक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये भारतातील SIR (Special Intensive Revision) च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, 1952 ते 1956 या कालावधीत निवडणूक आयोगाने देशातील बहुतांश भागांत मतदार याद्यांचे विस्तृत पुनरीक्षण केले होते. त्यानंतर 1957, 1961, 1965 आणि 1966 मध्येही देशातील बहुतांश भागांत मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्यात आले.

पुढे 1983–84, 1987–89, 1992, 1993 आणि 1995 या कालावधीतही मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्यात आले. तसेच, 2002, 2003 आणि 2004 मध्ये निवडणूक आयोगाने पुन्हा मतदार याद्यांचे पुनरीक्षण केले.

घराघरात जाऊन माहितीची पडताळणी

विस्तृत पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत घराघरात जाऊन मतदारांकडून माहिती घेणे, मतदार गणना अर्ज (Enumeration Forms) वितरित करून ते जमा करणे तसेच मतदारांच्या नोंदींची पडताळणी करणे यांचा समावेश असतो. या प्रक्रियेत मतदार याद्या मतदार गणनेच्या (Enumeration) माध्यमातून नव्याने तयार करण्याची प्रक्रिया केली जाते.

फडणवीस यांच्या मते, वेगाने होणारे शहरीकरण आणि नागरिकांचे वारंवार होणारे स्थलांतर यामुळे मतदार याद्यांमध्ये मोठे बदल झाले आहेत. गेल्या 20 वर्षांत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नावे वाढली तसेच काही नावे वगळण्यात आली आहेत.

मतदार याद्यांची सखोल पडताळणी आवश्यक

कालांतराने नवीन पात्र मतदारांची भर, मृत्यू, स्थलांतर तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालेली नोंदणी यामुळे मतदार याद्यांमध्ये बदल होत राहतात. त्यामुळे मतदार याद्यांची वेळोवेळी सखोल पडताळणी करणे आवश्यक ठरते.

पात्र नागरिकांचा मतदार यादीत समावेश करणे आणि कोणताही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाऊ नये, हे निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले आहे.

मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी विस्तृत पुनरीक्षण ही निवडणूक व्यवस्थेतील दीर्घकाळापासूनची प्रक्रिया आहे. सध्याची Special Intensive Revision (SIR) ही त्याच व्यापक प्रक्रियेचा पुढील टप्पा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.