जळगाव:- सत्ताधाऱ्यांची सत्तेची भूक किती ? यांना भस्म्या झालाय का ? असा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला आहे.
सरकारनं गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर 500 कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या संस्थेत पाच संचालक नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनलनं 13 तर महायुतीच्या पॅनलनं 12 जागांवर विजय मिळवला होता. सतेज पाटील यांची सत्ता बसू नये यासाठी निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
त्या ट्विट करत म्हटल्या आहेत की, कोल्हापूरच्या जनतेने गोकुळच्या निवडणुकीत यांच्या विरोधात कौल दिला आहे. तरी ज्यांची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे ते सत्ताधारी आज बळजबरीने गोकुळच्या खुर्चीवर दावा ठोकण्याचा प्रयत्न करत आहे. सत्तेच्या जोरावर संचालक मंडळाचे गणित बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सत्ताधारी किती रडके आहेत याचे हे आणखी एक उदाहरण आहे असे त्या म्हणाल्या आहेत.
निवडणुकीत पराभव झाला की तो स्वीकारण्याऐवजी नियम बदलायचे, शासनाचा वापर करायचा आणि सत्ता मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायचे! सत्तेसाठी एवढी हपापलेली वृत्ती लोकशाहीला घातक आहे असेही त्या म्हणाल्या.
