चिपळूण : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चिपळूण, बिट फुरूस यांच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह विशेष कार्यक्रम व सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन कोसबी येथे करण्यात आले. ‘सशक्त बालक, सुदृढ भारत’ आणि ‘सुपोषित बालक, सुदृढ माता, निरोगी कुटुंब’ हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिला व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कोसबी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोसबी नं. १ येथे झालेल्या या कार्यक्रमात पोषण आहाराचे महत्त्व, माता व बालकांचे आरोग्य, संतुलित आहार आणि कुटुंबाच्या आरोग्यविषयक सवयी याबाबत जनजागृती करण्यात आली. महिलांनी दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा, तसेच बालकांच्या पोषणाकडे विशेष लक्ष द्यावे, यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमात पौष्टिक पाककृती प्रदर्शन, टीएचआर (THR) पाककृती प्रदर्शन, फळे व भाज्यांची आकर्षक सजावट, तसेच माता व बालकांसाठी विविध विशेष उपक्रम राबविण्यात आले. पोषण आहारविषयक मार्गदर्शनातून उपस्थित महिलांना संतुलित आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. महिला व बालकल्याण योजनांच्या लाभार्थ्यांचे स्वागतही करण्यात आले.
नाचणीच्या मोदकांचे कौतुक; बचत गटाचा सन्मान
कार्यक्रमातील पौष्टिक पाककृती प्रदर्शनात नाचणीचे मोदक तयार करणाऱ्या सरिता बामणे यांच्या उपक्रमाचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. पौष्टिक तृणधान्यांचा आहारात समावेश करण्याच्या दृष्टीने नाचणीसारख्या पदार्थांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणावर हळद लागवड करणाऱ्या बचत गटाचाही गौरव करण्यात आला. महिलांच्या कौशल्याला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देणारे हे उपक्रम ठरले.
महिलांची आरोग्य तपासणी
एकात्मिक बालविकास अधिकारी सौ. रेखा कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पोषण आणि आरोग्य यांचा परस्परांशी असलेला संबंध स्पष्ट करत माता व बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सीएचओ खेळूकर, आरोग्य सेविका तांबे आणि आरोग्यसेवक भुवड यांनी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी केली.
कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून सुर्यकांत खेतले (सभापती पंचायत समिती चिपळूण), सौ. पुजाताई निकम (सदस्या जि. प. रत्नागिरी), सौ. उमा घारगे-पाटील (गटविकास अधिकारी चिपळूण), संजयराव कदम (सदस्य जि. प. रत्नागिरी), मा. सौ. शिगवण (प्रकल्प अधिकारी ए. बा. वि. योजना), सौ. मनस्वी बैकर (सदस्या पंचायत समिती चिपळूण) यांच्यासह माजी सरपंच दत्ताराम गुजर, ग्रामसेवक शिवडे, वंचितचे नेते महेश सावंत, भाई गुजर, अण्णा सावंत, प्रणाली विचारे, श्वेताली सावंत, प्रियांका मोरे, अपूर्वा सुर्वे, प्रियांका अंकुशराव, राघिणी मोहिते, अर्पिता सुकाटे, स्मिता वाडेकर, रत्नप्रभा वाडेकर, विजय वाडकर, वंदना गुजर, प्रमोधिनी सुर्वे यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’
‘पोषणाचा मंत्र घरोघरी, सुदृढ आयुष्य प्रत्येक घरी!’ आणि ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संदेशांतून पोषणविषयक जनजागृतीचा संकल्प व्यक्त करण्यात आला. माता, बालके आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी पोषणविषयक जागरूकता, आरोग्य तपासणी आणि लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
राष्ट्रीय पोषण माहाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे महिलांना पौष्टिक आहार, आरोग्यविषयक काळजी आणि स्थानिक पातळीवरील पौष्टिक पदार्थांचे महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळाली.
