चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या वतीने आयोजित ‘नवरात्र भारतमातेचे’ या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प भारतीय संस्कृतीचे अभ्यासक धनंजय चितळे यांनी गुंफले. ‘वंदे मातरम्’ या गीतातील ‘सुजलाम्’ शब्दाचा अर्थ स्पष्ट करत त्यांनी भारतीय जलसंस्कृती, प्राचीन जलव्यवस्थापन, नद्यांचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आणि जलसंवर्धनाच्या परंपरांवर प्रकाश टाकला.
‘सुजलाम्’ या शब्दाचा अर्थ केवळ विपुल पाणी असलेला प्रदेश एवढाच मर्यादित नसून, पवित्र जलाने समृद्ध असलेला प्रदेश असाही होतो, असे चितळे यांनी सांगितले. प्राचीन भारतातील कृषिज्ञानाचा संदर्भ देताना त्यांनी ‘कृषिपाराशर’ या ग्रंथातील जलसंधारण, पर्जन्यमापन आणि शेतीविषयक ज्ञानाचा उल्लेख केला. भारतीय ज्ञानपरंपरेत निसर्गाचे निरीक्षण, पाण्याचे महत्त्व आणि जलव्यवस्थापन यांचा सखोल विचार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती संस्कृतीचा आधार आहे, असे सांगताना त्यांनी स्कंदपुराण आणि देवीभागवतातील संदर्भांद्वारे जलाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व विशद केले. जलस्रोतांचे जतन, नद्यांची स्वच्छता आणि लोकहितासाठी जलव्यवस्था निर्माण करण्याला भारतीय परंपरेत विशेष स्थान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गंगा आणि यमुना या नद्यांचे प्रतीकात्मक महत्त्व तसेच नदीपूजनाच्या परंपराही त्यांनी उलगडून सांगितल्या.
छत्रपती शिवाजी महाराज आणि कृष्णा नदीशी संबंधित लोकपरंपरेचा उल्लेख करत त्यांनी इतिहास, लोकश्रद्धा आणि नद्यांमधील भावनिक नाते स्पष्ट केले. कृष्णा, कोयना आणि वेण्णा नद्यांच्या संगमाचे सांस्कृतिक महत्त्व तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सिंधू नदीवरील काव्याचाही त्यांनी संदर्भ दिला.
व्याख्यानाच्या उत्तरार्धात त्यांनी ग्रंथालयाच्या सामाजिक भूमिकेवर भाष्य केले. ग्रंथालय हे केवळ पुस्तकांची देवघेव करणारे ठिकाण नसून ज्ञान, संस्कार आणि सांस्कृतिक जाणीव निर्माण करणारे केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तुसंग्रहालयाला व कलादालनाला भेट देण्याचे तसेच ग्रंथालयाचे सभासदत्व स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. स्वरा केळकर यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताचे सुरेल गायन सादर केले. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा, जलसंवर्धन, नद्यांचे सांस्कृतिक महत्त्व आणि ग्रंथालयांची सामाजिक भूमिका यांचा वेध घेणारे हे व्याख्यान उपस्थितांसाठी ज्ञानवर्धक ठरले.
