लांजा: तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे करणे काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक जाणिवेतून जिल्हा परिषद शाळा लांजा, उर्दू येथील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी एकत्र येत धुंदरे येथे बंधारा बांधला. या उपक्रमातून पाणी अडवा, पाणी जिरवा हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
पावसाचे पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक साठा होण्यास मदत व्हावी तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने बुधवार १४ ऑक्टोबर रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांसोबत प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग घेतल्याने त्यांच्यामध्ये पाण्याचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
या उपक्रमात शिक्षक फकरूद्दीन कोतवडकर, आजीमुद्दीन शेख, जुवेरीया रईस यांच्यासह पालक हाफिज ठाकूर, फैरोज मुजावर आणि लांजा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे राजेश लांजेकर आदी सहभागी झाले होते.
