बोरज : ‘मुख्यमंत्री संवाद यात्रा – जागर आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ज्ञानदीप फार्मसी कॉलेज, बोरज येथे एम इ एस आयुर्वेद महाविद्यालय व पशुराम हॉस्पिटल यांच्या वतीने आरोग्य जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात ‘मोबाईल, सोशल मीडिया व वाढता स्क्रीन टाइम’ या विषयावर महाविद्यालयाच्या विद्यार्थी समुपदेशक सौ. स्नेहा साडविलकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी स्क्रीन वापराचे नियोजन, डिजिटल संयम आणि मानसिक आरोग्य जपण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
तसेच ‘संतुलित आहार’ या विषयावर डॉ. विजयकुमार शनावडे यांनी मार्गदर्शन केले. दैनंदिन आहारात पोषक तत्त्वांचा समावेश, नियमित जेवणाची वेळ आणि आहारातून निरोगी जीवनशैली अंगिकारण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक करिता महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डॉ. श्रेयस जोशी यांनी वक्ते तसेच उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप फार्मसी कॉलेज, बोरज यांचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल संयम आणि संतुलित आहाराबाबत आरोग्य जाणीव निर्माण झाली.